पंकज रोडेकर, ठाणे जिल्हा परिषदेने ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. आजघडीला पालघर जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात झाल्याने तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. ठाणे जिल्ह्यातपाणीटंचाई भासत नसली तरी तेथील काही तालुक्यांमधून टँकरची मागणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या आराखड्यात एप्रिल आणि जून या महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील १४८ गावे, २६८ पाडे तसेच पालघरमधील ७५ गावे आणि ३६२ पाडे पाणीटंचाईग्रस्त म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही टंचाई दूर व्हावी म्हणून ठाण्यासाठी १८१.३० लाख तर पालघरसाठी २०७.५० लाख अपेक्षित खर्च प्रशासनाने डोळ्यांसमोर ठेवल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर प्रथमच दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळे संभाव्य पाणीटंचाईचे कृती आराखडे तयार करण्यात आले. त्यानुसार, आॅक्टोबर २०१४ ते जून २०१५ दरम्यान १७८ गावे तर ३९५ पाडे ठाणे जिल्ह्यात संभाव्य टंचाईग्रस्त असून त्यांच्यासाठी ४११.९५ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ दरम्यान अपेक्षित खर्च शून्य मांडला होता. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ३० गावे आणि १२७ पाड्यांमध्ये टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवित त्यासाठी २३०.६५ खर्च अपेक्षित धरला आहे. मात्र, मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवली नसली तरी एप्रिल ते जूनदरम्यान १४८ गावांत, २६८ पाड्यांत पाणीटंचाईची शक्यता वर्तवित त्यासाठी १८१.३० लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. त्याचबरोबर उपाययोजना म्हणून टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.पालघर जिल्ह्यात आॅक्टोबर २०१४ ते जून २०१५ दरम्यान १०२ गावे तर ४५० पाडे संभाव्य टंचाईग्रस्त असून त्यासाठी २९०.९० लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यामधील आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ दरम्यान अपेक्षित खर्च म्हणून ठेवलेल्या २६.२५ लाख रकमेला जिल्हाधिकाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात मंजुरी दिली आहे. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ८३.४० खर्च अपेक्षित धरला होता. या वेळी २७ गावे आणि ८८ पाड्यांमध्ये टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार, मोखाडा आणि जव्हारमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मोखाड्यात दोन तर जव्हारात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते जून २०१५ दरम्यान ७५ गावे आणि ३६२ पाड्यांत संभाव्य टंचाई डोळ्यांसमोर ठेवून २०७.५० लाख खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर
By admin | Published: April 02, 2015 4:52 AM