मुंबई : वाडा ते ठाणे या मार्गावरील ७९५ मीटर लांबीच्या वंजारपट्टी फ्लायओव्हरचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, या मार्गावर प्रवाशांना आता जलदगतीने प्रवास करणे शक्य होणार आहे. वंजारपट्टी या फ्लायओव्हरवर शिवाजी चौक येथून येणारी आणि नाशिक महामार्गाकडे जाणारी अनुक्रमे ३८० आणि ३२० मीटर लांबीच्या अशा दोन अतिरिक्त मार्गिका असणार आहेत. येत्या मार्च अखेरपर्यंत वंजारपट्टी फ्लायओव्हर पूर्ण होण्याची शक्यता असून, फ्लायओव्हरच्या दोन अतिरिक्त मार्गिका पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले की, मुंबई महानगर प्रदेश हा जगातील सर्वांत मोठा आणि जलदगतीने विकसित होणारा नागरी प्रदेश आहे. हा प्रदेश ४ हजार ३५० चौरस मीटर परिसराहून अधिक विस्तारलेला आहे. या प्रदेशात १७ शहरांसह २३ दशलक्ष लोकसंख्या असून, ९ दशलक्ष रोजगार उपलब्ध आहेत. सर्वंकष वाहतूक अभ्यास (२००७) आणि व्यवसाय आरखडा (२००९) यासारख्या विविध अभ्यासांनी या प्रदेशात जलदगतीने विकास होण्याचे संकेत दिले आहेत. शिवाय प्रदेशातील पायाभूत सुविधांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.वाढती लोकसंख्या आणि रोजगाराचा विचार करता प्राधिकरणाने यापूर्वीच पायाभूत सुविधांबाबत काही पावले उचलली असून, वंजारपट्टी हा त्याचाच एक भाग आहे. (प्रतिनिधी)
ठाणे-वाडा प्रवास होणार जलद
By admin | Published: February 09, 2015 5:48 AM