ठाणे : ठाणे महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रीडा धोरणानुसार इनडोअर, आऊटडोअर, मैदाने विकसित करणे, खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, खेळांचे आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन विकसित करणे यावर भर देण्यात येणार आहे. लवकरच या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांचा सन्मान करण्याबरोबरच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. प्रभागनिहाय मोकळ्या जागा, बागबगिच्यांमध्ये खेळाबाबत सुविधा निर्माण करणे, बंदिस्त व्यायामशाळा, खुल्या व्यायामशाळा, योगासनशाळा सुरू करणे आदींचाही यात समावेश आहे. क्रीडा धोरण खेळाडूंपुरते मर्यादित न ठेवता ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. आरक्षित मैदाने विकसित करणे, बंदिस्त प्रेक्षागृहे बांधणे, बास्केटबॉल, कुस्ती, टेबल टेनिस, कॅरम, कार्ड, चेस रूम, तरण तलाव असे इनडोअर गेम्स आणि व्हॉलिबॉल, क्रिकेट अॅकॅडमी, ओपन जिम, मल्लखांब, डबलबार, सिंगलबार अशा आउटडोअर गेम्सचा समावेश असेल. प्रभागनिहाय आरक्षित भूखंड आणि अॅमिनिटी प्लॉट्स विकसित केले जाणार आहेत. यातील काही मोकळ्या भूखंडांची यादीही पालिकेने तयार केली आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यातील मैदानांचा होणार विकास
By admin | Published: September 24, 2014 4:45 AM