नागपूर : ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अनुकंपधारकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात १५ दिवसात निर्देश देण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.सप्टेंबर २०१५ अखेर टप्पा अनुदान, अनुकंपधारक समायोजन, मुख्याध्यापक मंजुरी, पर्यवेक्षक मंजुरी, वैद्यकीय देयके, अशी एकूण ९८ प्रकरणे प्रलंबित होती. अनुकंपधारकांची प्रकरणे वगळता इतर प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षणाधिकारी कार्याालयात उपस्थित नसतात. त्यामुळे विभागाची यंत्रणा काम कसे करणार असा प्रश्न नागो गाणार यांनी केला. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिक्षण विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे आनंद मोते यांनी निदर्शनास आणले. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी लोक प्रतिनिधींच्या प्रश्नांना १० दिवसांत उत्तरे देण्याचे निर्देश तावडे यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आनंद मोते यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावर त्यांनी उपप्रश्न उपस्थित केले. (प्रतिनिधी)
ठाणे जि.प.च्या शिक्षण विभागातील पदे भरणार
By admin | Published: December 22, 2015 2:01 AM