लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिल्लीतील त्यागराज स्टेडियम येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल अॅथलेटिक स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटात ठाण्याच्या अदिती बाळकृष्ण परब हिने १०० व २०० मीटर या दोन्ही स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. या वेळी विजेत्या स्पर्धकांना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल आणि पेट्रोलियममंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. गेल कंपनी आयोजित गेल स्पीड स्टार इंडिया ही स्पर्धा ९ ते १० मे दरम्यान, १४ ते १७ या दोन्ही वयोगटांत दिल्लीत खेळण्यात आल्या. या स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात ठाण्याच्या अदिती हिची निवड झाली होती. तिने या संधीचे सोने करताना १०० व २०० या दोन्ही गटांत खेळताना, १०० मीटर अंतर १२.५ सेकंद आणि २०० मीटरचे अंतर २५.९४ सेकंदांत पार करून अव्वल क्रमांक पटकावल्याने ठाण्याच्या शिरपेचात तुरा रोवला आहे. तिची कामगिरी पाहून ज्येष्ठ धावपटू पी.टी. उषा आणि कविता राऊत यांनी तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे.अदिती ही ठाण्यातील दादोजी क्रीडांगण येथे नीलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अॅथलेटिक्सचे धडे गिरवत आहे. तसेच ती ऐरोली येथील डीएव्ही स्कूलमध्ये नववीत शिकत आहे.
ठाण्याची अदिती परब १०० व २०० मीटर स्पर्धेत अव्वल
By admin | Published: May 14, 2017 3:13 AM