ऑनलाइन लोकमत
ठाणे,दि.16 - राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने मान्यता दिली आहे. ठाण्यातील आघाडीबाबत एकमत झाले असून मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसच्या हाताला हात देण्याची तयारी सुरू असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना काँग्रेस- राष्ट्रवादीने पाठींबा दिला असून त्यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील एका खासगी हॉटेलमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोकण शिक्षक मतदारसंघातून पाटील यांनी विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती देतांनाच राज्यात विधानपरिषदेसाठी काँग्रेसची आघाडी झाल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे हे निवडणूक लढवतील. नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच नागपूर शिक्षक अशा तीन जागांवर काँग्रेस लढणार आहे.
अशीच आघाडी आता ठाणो महापालिकेतही होणार आहे. मुंबईमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी आम्ही आग्रही होतो. मात्र, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरु पम यांच्या हट्टीपणामुळे ही आघाडी होऊ शकलेली नाही. त्यांनी एक महिन्यापूर्वीच काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. दुसरी यादी अजून बाकी आहे. अजूनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जर तयारी दर्शविली तर मुंबईतही आघाडी करण्याची तयारी असल्याचे त्यांनी जाहीर केले. नारायण राणे यानी देखील यासाठी सकारत्मकता दखवल्याचे ते म्हणाले.