शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना!
निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर आता पक्षाची घटना, कार्यालय अशी एकएक व्यवस्था निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या पक्षाचे मुख्यालय ठाण्यातील आनंदाश्रमात असेल असे स्पष्ट करण्यात आल्याने राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाचे मुख्यालय मिळण्याचा मान ठाणे शहराला प्रथमच मिळाला आहे. शिंदे यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्रिपद मिळाले. आता मुख्यालयही. त्यामुळे ठाण्याची शिवसेना- शिवसेनेचे ठाणे ही घोषणा सर्वार्थाने प्रत्यक्षात आली आहे.
आमदार म्हणतात हात-पाय तोडू...
कर्जाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा करणाऱ्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मोर्चा नेत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी लिलावात शेती घेणाऱ्यांचे हात-पाय तोडू, अशी धमकी दिली आहे. कडू हे सध्या सत्ताधारी पक्षांसोबत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. पण त्यांनी थेट धमकी दिल्याने बँकेने थकलेली कर्जे कशी वसूल करायची, याचे उत्तर मिळालेले नाही. शिवाय या धमकीवर सत्तेतील अन्य प्रमुख पक्षांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने त्यांचीही याला मूक संमती आहे का, असाही प्रश्न उभा राहिला आहे.
बाऊन्सरची सेल्फी, ट्रोलर्सचे टीकास्त्र !
पार्श्वगायक सोनू निगम याला चेंबूर परिसरात सेल्फीच्या वादात स्थानिक आमदाराच्या मुलाने धक्काबुक्की केली. या प्रकरणाची चौकशी पोलिस करत असले तरी या घटनेनंतर दोघांनाही ट्रोलर्सच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘बाऊन्सर का गेले फोटो काढायला?’ असा टोमणा काहींनी लगावला. तर स्थानिक आमदाराच्या मुलाची गुंडगिरी सुरू झाल्याची टीका काहीजण करत आहेत. आठवड्याभरात सेल्फीच्या वादात क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि आता सोनू निगम यांच्याशी झटापट झाल्यानंतर सेलिब्रिटीही आता सेल्फी काढायला धजावतील का?, ही एक शंकाच आहे.