मालेगाव (जि. वाशिम): ठाणेदार मिर्झा यांनी पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडीयावर दुसर्यांना पाठवून पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकार्यांनी केल्यामुळे ठाणेदार अडचणीत सापडले आहेत. मालेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक के.आय.मिर्झा यांनी सोशल मिडीयावर १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत अपमानास्पद वक्तव्याची व्हीडीओ पोस्ट व्हॉटस अपवर अन्य गृपवर पाठविली. याबाबत भाजपाच्या काही पदाधिकार्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकार्यांकडे तक्रार केली. तसेच त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. भाजपाचे तालुका सरचिटणीस मोहन बळी यांनी यावर जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेशी संपर्क साधून सदर वादग्रस्त ध्वनीचित्रण निदर्शनास आणून दिली. यावर पोलिस उपविभागीय अधिकारी मेघराजन यांनी तात्काळ दखल घेणार असल्याचे आश्वासन बळी यांना दिले. ठाणेदारांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांंंचेच लक्ष वेधले आहे. सदर ध्वनीचित्रफित पालकमंत्री, खासदार, तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींना संपर्क साधून पाठविण्यात आली आहे.