राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा तसंच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनानी माफ करावे असे ते म्हणाले.
माझा अडीच वर्षांचा मंत्री म्हणून कार्यकाळ हा शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या दृष्टीने तरी चांगला गेला. खूप चांगले निर्णय घेता आले. लोकोपयोगी कामे करता आली. मंत्री म्हणून काम करीत असतांना या अडीच वर्षांत गृहनिर्माण विभागाचे माझे पहिले सचिव संजीव कुमार, त्यानंतरचे गृहनिर्माण सचिव श्रीनिवासन आणि आत्ताचे सचिव मिलिंद म्हैसकर त्याचबरोबर म्हाडाचे सचिव डिग्गीकर, म्हाडाचे मुंबई विभागाचे मुख्य अधिकारी म्हसे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी सतिश लोखंडे, रिपेअर बोर्डाचे अधिकारी डोंगरे यांचे माझ्या सर्व निर्णयांमध्ये अभूतपूर्व योगदान होते, असे आव्हाड म्हणाले. माझे यश मोजले तर त्यामध्ये माझं स्वत:चं योगदान १ टक्का इतकेच आहे. बाकी या सगळ्या अधिकाऱ्यांचे योगदान आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांचे योगदान हे ९९ टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री पदाची जबाबदारी असताना अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांशिवाय व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय काम करणे हे निव्वळ अशक्य असतं. त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान हे वेळोवेळी उपयोगी पडले. त्यामुळेच जे काही निर्णय घेता आले, ते योग्यरितीने पुढे नेण्यात मी यशस्वी झालो, असेही आव्हाड यांनी नमूद केले. परत एकदा गृहनिर्माण विभाग, म्हाडा, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण यामधील सर्व अधिकाऱ्यांचे, कर्मचारी वर्गाचे, माझे वाहन चालवणारे माझे सारथी, माझ्या बरोबर फिरणा-या चोपदारापासून, माझ्या शासकीय निवासस्थानी येणाऱ्या प्रत्येकाची नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था करणारे स्वयंपाक घरातील माझे कर्मचारी. कारण माझ्याकडून कधी कोणी अडीच वर्षांत उपाशीपोटी गेला असे कधीच झाले नाही. या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. कारण यांच्यामुळेच मला सहज काम करता आले. सत्ता येते, सत्ता जाते पण, या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्याबद्दल फारसे काही न बोलता आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार मानतो. कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनाने माफ करावे, असेही ते म्हणाले.