ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - केंद्र सरकारने नीटची परीक्षा या वर्षापुरती स्थगिती देणारा अध्यादेश काढल्याबद्दल पंतप्रधानांचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या डोक्यावर टांगती तलवार होती. त्यांनी आज सुटकेचा निश्वास सोडला असे सांगत मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे व खास करून पंतप्रधानांचे आभार मानतो असे ठाकरे म्हणाले.
आता पुढच्या वर्षी नीट द्यावी लागणार आहे, त्यासंदर्भात काय तयारी करायची याचा नंतर विचार करता येईल असे सांगताना यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असल्याचे ठाकरे म्हणाले.
आपण पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केली आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसात त्यांनी हा निर्णय घेतला. आमच्या आवाहनाला पंतप्रधानांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार असे ठाकरे म्हणाले.