उद्धव ठाकरे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत काल सायंकाळपासून अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका सभेमध्ये नवनीत राणांवर टीका केली आहे. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही, असे ते म्हणाले आहेत.
यावेळी टीका करताना राऊत यांनी वादाला तोंड फुटू शकणारे वक्तव्य केले आहे. विकासाचं पोरगं तुम्हाला झाले नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचे नाही. आपला उमेदवार बलवंत वानखेडे आहे. रात्र वैऱ्याची आहे. रात्रीस खेळ चाले, असे राऊत म्हणाले आहेत.
याचबरोबर राऊत यांनी भाजपा आणि शिंदेंवर देखील टीका केली आहे. जे घाबरले ते पळाले, ते गद्दार झाले. पळपुटेपणा करणाऱ्यांचा कधीच इतिहास लिहिला जात नाही. 56 इंचाची छाती महाराष्ट्रात नाही, तर लडाखमध्ये दाखवा. कधीच हा महाराष्ट्र मोदी, शाहंपुढे गुडघे टेकणार नाही, असा शब्दांत राऊतांनी मोदींवर टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आठ आठ दिवस वेटिंगवर ठेवले जाते. रोज उठतात दिल्लीला जातात. हा मुख्यमंत्री एवढा लाचार आहे, अशी टीका त्यांनी शिंदे यांच्यावर केली. अमरावती हे विदर्भाचे नाक आहे. अमरावतीची एक संस्कृती आहे. अमरावतीची प्रतिष्ठा पाच वर्षात महाराष्ट्र आणि दिल्लीत धुळीस मिळाली आहे. छाताडावर मोदी नावाचा जो राक्षस बसला आहे त्याला खाली ओढण्यासाठी नवनीत राणांचा पराभव केला पाहिजे, असे सांगत सौ दाऊद एक राऊत असे लोक उगाचच म्हणत नाहीत, याची आठवण राऊत यांनी करून दिली.
ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य समजून कामाला लागा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश समजून ताकदीने कामाला लागा, असे आदेशही राऊतांनी शिवसैनिकांना दिले.