बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली, तेव्हा माझे त्यांना अटक न करण्याचे आदेश होते. 2008 मध्ये सुभाष देसाई आणि संजय राऊत असे तीघे जण आलेले, केस संबंधी चर्चा करण्यासाठी. कोर्टात साहेब केस मागे घेतो म्हणाले. जज बोलले की काय करत आहात तुम्ही, ती केस काढली गेली. असेच एक वादळ आताही उठलेय. ते कधीतरी शांत होईल, मग एकमेकांचे आवाज ऐकू येतील, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आणखी एक अपेक्षा व्यक्त केली.
शिवसेना एकत्र असली पाहिजे, राहिली पाहिजे, गावगावातल्या शिवसैनिकांचे काय? शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठी माणसाला वाटणार नाही. शिवसैनिकाच्या रक्तात सेना आहे, त्यामुळे तो सेनेपासून दूर जाऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मंडल आयोगावरून मतभेद झाल्यावर मी बाहेर पडलो होतो. तत्कालीन कमिशनरांना मी बाळासाहेबांना अटक करायची नाही असे सांगितले होते. अटक झाल्य़ावर त्यांना जामीन मिळत असेल तर मिळू द्या, आडकाठी आणू नका असे आदेश दिले होते, असा खुलासा भुजबळ यांनी केला.
केस संपल्यावर उद्धव यांनी निरोप दिला की तुम्हाला चहाला बोलावले आहे. नंतर काही दिवसांनी आम्ही सहपरिवार मातोश्रीवर गेलो आणि आमचे पाहिल्यासारखे प्रेम राहिले. आमचे वादविवाद आहेत, भांडणे होती नाही असे नाही. आताचे मुख्यमंत्री माझ्या शेजारी बसायचे. मला असे वाटते की आमचे भांडण जोरदार होते, पण एक वेळ आली की बाळासाहेबांनी मला माफ केले, ती वेळ पुन्हा यायला हवी, अशी आशा भुजबळ यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत व्यक्त केली.
ठाकरेंचे मंत्रिमंडळ आले तेव्हा 2 वर्षे कोरोना होता. कार्यकर्ते सुद्धा घरी होते. 2 वर्षे कुणी कुणाला भेटले नाही, हे नाकारू शकत नाही. ओबीसी आरक्षणाविषयी फडणवीस यांच्याशी बोललो आहे, भाटिया कमिशनने अहवाल दिलाय. शेवटच्या टप्प्यात शिंदे व फडणवीस यांच्यावर हे काम गेलंय, आता अपेक्षा आहे की असा निर्णय व्हावा की देशभरातील ओबीसी ना आरक्षण मिळावे, असेही भुजबळ म्हणाले.