"...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या" १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 07:03 PM2024-04-20T19:03:07+5:302024-04-20T19:04:05+5:30
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा वर्षा बंगल्यावरील 1989 चा किस्सा सांगितला. तेव्हा, आपल्याला बारामती लोकसभेचे तिकीट मिळावे, अशी लोकांची इच्छा होती. मात्र त्याला शरद पवारांनी कसा विरोध केला, हे दादांनी सांगितले...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा जबरदस्त प्रचार सुरू आहे. मात्र, राज्याचे लक्ष लागले आहे ते बारामती लोकसभा मतदार संघाकडे. येथे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अर्थात 'नणंद-भावजयी' या एकमेकिंविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट निर्माण झाल्याने येथे ही परिस्थिती उद्भवली झाली आहे. या दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. आज बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा वर्षा बंगल्यावरील 1989 चा किस्सा सांगितला. तेव्हा, आपल्याला बारामती लोकसभेचे तिकीट मिळावे, अशी लोकांची इच्छा होती. मात्र त्याला शरद पवारांनी कसा विरोध केला, हे सांगत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. ते कण्हेरी येथे बोलत होते.
वर्षा बंगल्यावरील त्या किस्याची आठवण सांगताना अजित पवार म्हणाले, "१९८९ साली स्वर्गिय हिरेमठ काका, विजय कोलते आणि बारामतीतील काही लोक असे साहेबांना (शरद पवारांना) वर्षा बंगल्यावर भेटायला गेले होते. ते साहेबांना म्हणाले, साहेब बारामतीमध्ये अजितला लोकसभेची उमेदवारी द्या. त्यावर साहेब म्हणाले, असं करा, मी जातो आता काटेवाडीला शेती करायला, त्याला इकडे पाठवा आणि राजकारण करू द्या. एवढं म्हटल्यानंतर, तोंडात मारल्यासारखे सगळे आले."
...मात्र तुम्ही भावनिक होऊ नका -
कण्हेरी येथील सभेत उपस्थितांना आवाहन करताना अजित पवार म्हणाले, "या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तुमच्या भविष्याचा, संसाराचा विचार करून महायुतीच्याच उमेदवाराला निवडून द्या. निवडणुकीत तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. शेवटच्या सभेत तर त्यांच्या डोळ्यांत अश्रूही येऊ शकतात. मात्र तुम्ही भावनिक होऊ नका."
...म्हणून शारदानगरच्या शिक्षिकेला कामावरून कमी करण्यात आले -
या वेळी, अजित पवार यांनी शरद पवार गटाकडून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. "मतदानासाठी माझ्याकडून धमकावले जात असल्याचे काहीजण बोलतात. मात्र, आपण मतासाठी धमकावत बसलो असतो तर लोकांनी एवढ्या मतांनी निवडून दिले असते का? असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच, शारदानगर परिसरात काय चाललेय बघा, एका शिक्षिकेचा मुलगा घड्याळाचा प्रचार करत असल्याचे कारण सांगत, त्या शारदानगरच्या शिक्षिकेला कामावरून कमी करण्यात आले," असा आरोपही अजित पवारांनी यावेळी केला.