पुण्यातील कल्याणीनगर येथे भरधाव कार चालवून दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीनाविरोधात समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर पुन्हा एकदा कारवाईस सुरुवात झाली आहे. दरम्यान, या अल्पवयीन आरोपीचा कथित रॅप व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. तसेच या मुलाच्या असंवेदनशीलतेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, या अल्पवयीन मुलाच्या आईने हा व्हिडीओ त्याचा नसल्याचा खुलासा केला आहे.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून दोन जणांचा बळी घेणाऱ्या या बाळाच्या आईने त्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी त्या बाळाची आई आहे. मी प्रसारमाध्यमांना विनंती करते की, जो व्हिडीओ प्रसारित होत आहे तो माझ्या मुलाचा नाही. तो बनावट व्हिडीओ आहे. माझा मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे. कृपया त्याचं संरक्षण करा, अशी मी पोलीस कमिश्नर यांना विनंती करते.
दरम्यान, अपघातानंतर काही तासांतच जामीन मिळाल्यानंतर सदर आरोपीने घरी जाऊन एक रॅप साँग केल्याचा दावा केला जात होता. या रॅप साँगमध्ये अनेक आक्षेपार्ह शब्द असून दोन जणांचे प्राण गेल्यानंतरही आरोपीला कसलाही पश्चाताप झाला नसल्याचं या व्हिडिओतून दिसत होतं. मात्र त्या आरोपीच्या आईने हा व्हिडीओ त्याचा नसल्याचं स्पष्टीकरण दिल्याने आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या बाबतीतील बालहक्क न्यायालयाच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर, या न्यायालयाने बुधवारी आपला जुना निर्णय बदलून, अल्पवयीन मुलाला १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने रविवारी ‘बाळा’ला काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केला होता. यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला आणि पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केले. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बालहक्क न्यायालयाने आता पूर्वीचा निर्णय बदलून नवे आदेश दिले. अपघातावेळी ते 'बाळ' दारू प्यायले होते, हे न्यायालयाला पटवून देण्यात पुणे पोलिस यशस्वी झाले. हे ‘बाळ’ दारूच्या नशेत होते, हे सांगण्यासाठी पुणे पोलिसांनी बाळानं कोझी किचन या हॉटेलमध्ये भरलेले ४८ हजार रुपयांचे बिल न्यायालयासमोर सादर केले. ज्यामध्ये या ‘बाळा’ने दारूसाठी पैसे मोजल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हे ‘बाळ’ दारू पीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आले होते.