गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिकच तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्कम चर्चा झाल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याच बरोबर, आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत ट्विट्ससंदर्भात चर्चाही केली. यावर ते ट्विटर हँडल माझे नाही, असे बोम्मई यांनी म्हटल्याचेही शिंदेंनी सांगितले. तसेच, सर्वांनी मिळून, कुठलेही पक्षीय राजकारण न करता मराठी माणसांच्या पाठीशी उभे रहायला हवे, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
शिंदे म्हणाले, आज अमित शाह यांनी बैठक बोलावली, या बैठकीला मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि गृहमंत्री उपस्थित होतो. गेल्या काही दिवसांत कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात ज्या घटना सुरू होत्या, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला त्रास होऊ नये, मराठी भाषेचा सन्मान व्हावा. तसेच मराठी माणसांवर कुठलाही अन्य होऊ नये, अशी भूमिका राज्यसरकारची म्हणजेच आमची होती. त्या चर्चेत, गृहमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनीही ते मान्य केले आणि दोन्ही राज्यांत शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण रहावे, कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, अशा प्रकारची सूचना केंद्रिय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांना दिल्या आहेत.
मराठी माणसावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये -या प्रश्नावर तीन-तीन मंत्र्यांची समिती तयार होईल. आम्ही जे मुद्दे मांडले आहेत, त्यात मराठी शाळा असतील, मराठी भाषा असेल, मराठी माणसांचे कार्यक्रम असतील, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, अशी भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. त्याचा अवमान होऊ नये, याची काळजी दोन्ही राज्यांनी घ्यायला हवी, अशी भीमिका केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आहे. ते कर्नाटकच्या मुंख्यमंत्र्यांनीही मान्य केली आहे.
राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे रहा -आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या काही वक्तव्यांसंदर्भात आणि ट्विट्स संदर्भात चर्चाही केली. यावर त्यांनी, हे माझे स्टेटमेंट नाही, ते ट्विटर हँडल माझे नाही. आपण असे कुठलेही स्टेटमेंट केलेले नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे यात कुणी तरी आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. मराठी माणसांच्या भावनांशी खेळण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. शेवटी सर्वांनी मिळून, कुठलाही पक्षीय राजकारण न करता मराठी माणसांच्या पाठीशी उभे रहायला हवे. त्यांना अधिकात अधिक काय सहकार्य करता येईल, यावर विचार करायला हवा. ही बैठक अतीशय सकारात्मक झाली. यापुढे दोन्ही राज्यांतील नागरीकांना कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत.