मुंबई : सरकार बनविण्याचे सगळे मार्ग खुले आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. लोकांनी महायुतीला मतदान केले होते. असे वक्तव्य त्यांनी का केले, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा चर्चेला का आले नाहीत या चर्चांवरही उत्तर दिले.
छोट्या छोट्या राज्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी अमित शहा यांनी पुढाकार घेतला. मग महाराष्ट्रात का आले नाहीत अशी चर्चा गेल्या काही काळात सुरू झाली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी आमचे सत्ता स्थापनेचे मार्ग खुले असल्याचे म्हटले. त्यांनी 50-50 टक्के सत्तेत वाटा असे बोलले असते तर चालले असते. पण त्यांन केलेले वक्तव्य धक्का देणारे होते. एखादी चर्चा जेव्हा अंतिम टप्प्यात येते तेव्हाच राष्ट्रीय अध्यक्ष किंवा मोठा नेता येतो आणि त्यावर शिक्कामोर्तब करतो. लोकसभेवेळी असेच झाले होते. मात्र, जेथे चर्चाच सुरू झाली नाही तेथे शहा कसे येतील? असा सवाल करत त्यांनी स्पष्टीकरण दिले.
तसेच आम्ही युती तोडलेली नाही. तोडल्याची घोषणाही केली नाही. शिवसेनेकडून अशी घोषणा झाली असेल तर माहिती नाही. आमच्यामध्ये हिंदुत्वाचे नाते आहे. ठाकरेंशी माझे चांगले संबंध आहेत आणि राहतील, असेही फडणवीस यांनी म्हटले. तसेच या वितुष्टाला शिवसेना आणि उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यानी ते घेतले नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. तसेच त्यांच्या आजुबाजुचे लोक जे वक्तव्ये करतात त्यामुळे सरकार बनत नाही. असे समजू नका की आम्ही प्रत्यूत्तर देऊ शकत नाही. तुमच्या भाषेपेक्षा जास्त प्रभावी भाषा आम्ही वापरू शकतो. पण आम्ही असे करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
मोदींवर शिवसेनेकडून खालच्या पातळीवर टीका
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी पूजनिय आहेत. भाजपाच्या कोणत्याही नेत्याकडून त्यांचा अपमान होणे शक्य नाही. गेल्या पाच वर्षांत विरोधात लढलो तेव्हाही आमच्या नेत्यांनी टीका केली नाही. अगदी नरेंद्र मोदींनीही नाही. पण गेल्या पाच वर्षांत आणि गेल्या 10 दिवसांत मोदींवर शिवसेनेकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. दोन्ही ठिकाणी सत्तेत रहायचे आणि टीका करायची आम्हाला कधीही मान्य नाही. मोदीवर अशा प्रकारची काँग्रेसनेही केली नाही. ही टीका आमच्या जिव्हारी लागली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.