शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार व खुर्ची वाचवण्यातच गेले, नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 05:32 PM2022-10-07T17:32:49+5:302022-10-07T17:35:47+5:30

Nana Patole : गुजरातचे हित जोपसणे व महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ईडी सरकारने १०० दिवसात केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

The 100 days of the Shinde-Fadnavis government were spent in saving chairs, felicitations, Nana Patole alleged | शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार व खुर्ची वाचवण्यातच गेले, नाना पटोलेंचा आरोप

शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार व खुर्ची वाचवण्यातच गेले, नाना पटोलेंचा आरोप

Next

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने बंडाचा झेंडा फडकावल्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा कारभार हाती घेतला. आज शिंदे-फडणवीस सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार, देवदर्शन व खुर्ची वाचवण्यातच गेले, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थाने करुन पाडून शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले. या १०० दिवसात ईडी सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत. राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख थेट रोजगार निर्मितीचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घातला, इतर गुंतवणूकही घालवली. गुजरातचे हित जोपसणे व महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ईडी सरकारने १०० दिवसात केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण अद्याप पंचनामे पार पडलेले नाहीत, थातूरमातूर पंचनामे केले जात आहेत, शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली तीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मविआ सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर ५० टक्के कमी करावेत अशी मागणी करणारे आता मूग मिळून गप्प बसले आहेत. सीएनजी पीएनजीवरचे कर मविआ सरकारने कमी केले पण ईडी सरकारने कोणतेही कर कमी केले नाहीत उलट सीएनजी ८४ रुपये किलोपर्यंत वाढवण्याचे काम केले. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही तर गुजरातच्या हितासाठी, दिल्लीच्या आदेशानुसार काम करत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच या सरकारला काम करु दिले गेले नाही. सातत्याने सरकारच्या कामात खोडा घालणे, राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल यासाठी लव्ह जिहाद, मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा सारखे मुद्दे जाणीवपूर्वक काढले गेले. महाविकास आघाडी सरकार, महाराष्ट्र व मुंबईला बदनाम करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. राजभवनच्या माध्यमातूनही समांतर सरकार चालवले गेले, असा आरोप नाना पटोले भाजपावर केला.

याचबरोबर, कोरोनाच्या संकटातच महाविकास आघाडी सरकारी दोन वर्ष गेली, मात्र जगाला हेवा वाटावा असे काम कोविड संकटात महाविकास आघाडी  सरकारने केले. पण ते सरकार पाडण्यातच विरोधक व्यस्त होते. शेवटी कटकारस्थान करून ईडी सरकार आले आणि सत्ता येताच सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारच खुलेआमपणे हातपाय तोड्याची भाषा करू लागले, पोलीस अधिकाऱ्यांनाही धमकावण्याची भाषा सुरु झाली. दादरमध्ये गणेशोत्सव काळात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गोळीबार केला. पण यापैकी एकाही घटनेत कायदेशीर कारवाई करुन सरकारी गुंडगिरीला चाप लावला नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: The 100 days of the Shinde-Fadnavis government were spent in saving chairs, felicitations, Nana Patole alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.