NCP Ajit Pawar ( Marathi News ) :बदलापूर पूर्व येथील एका शाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरत आंदोलन छेडलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "अत्याचार प्रकरणातील नराधमांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे. एवढं कडक शासन व्हायला पाहिजे की पुन्हा असं करण्याचं त्यांचं धाडसच नाही झालं पाहिजे आणि असं काही करण्याच्या स्थितीतच ते राहिले नाही पाहिजेत," असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, "बलात्कार प्रकरणातील कायदा केंद्र सरकारने करणं आवश्यक असतं. कारण मागे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आम्ही शक्ती कायद्यासाठी प्रयत्न केला होता. शेजारच्या राज्यात जिथं हा कायदा बनवण्यात आला आहे, तिथंही आम्ही लोकांना पाठवलं होतं," असं अजित पवार म्हणाले. तसंच "काही लोकं म्हणतात की, मुलींनी रात्री उशिरा घराबाहेर पडू नये. मात्र मी याच्याशी अजिबात सहमत नाही. मुलांनी घराबाहेर पडलेलं चालतं, पण मुलींनीच का जाऊ नये? जो नियम मुलांना लावला जातो, तोच मुलींनाही लावला गेला पाहिजे. मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा," असं आवाहन त्यांनी केलं आहे.
"बदलापूरची घटना घडल्यानंतर लगेचच मी तिथल्या पोलीस आयुक्तांसोबत फोनवर बोललो होतो. कोणताही हस्तक्षेप न होऊ देता आरोपीवर कडक कारवाई व्हायला हवी, असं मी त्यांना सांगितलं होतं. या प्रकरणाची फास्टट्रॅकवर सुनावणी व्हायला हवी. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबतची माहिती दिली आहे," अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
दरम्यान, बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.