गेल्या काही दिवसांपासून शांततेत सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बीडमध्ये या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राजकीय नेत्यांना बसला आहे. याठिकाणी सकाळी माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या निवासस्थानी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती त्यानंतर आता बीडमध्ये आंदोलनाचे लोण पसरले आहे.
बीडमधील मुख्य बाजारपेठेत मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन जाळले आहे. त्यासोबत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही संतप्त आंदोलकांकडून पेटवण्यात आले आहे. बीडमधील शरद पवार गटाचे आंमदार संदीप क्षीरसागर यांनाही आंदोलनाचा जबर फटका बसला आहे. याठिकाणी मराठा आंदोलकांनी संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाळपोळ केली आहे. याठिकाणी क्षीरसागर यांची ४ ते ५ वाहने संतप्त आंदोलकांनी पेटवून दिली आहेत. त्यामुळे बीडमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सदर घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गावबंदीपर्यंत आम्ही समजू शकत होतो. पण, वाहनांची तोडफोड आणि एसटी जाळण्यात येत आहेत. आमदारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. आताची स्थिती कुणालाही आवडणारी नाही. गेल्यावेळी जगात प्रशंसा होईल, असं आंदोलन मराठा समाजानं केलं होतं, असं गिरीश महाजन म्हणाले. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे, असं आश्वासन देखील गिरीश महाजन यांनी दिलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कायमस्वरूपी आणि टिकणारे आरक्षण द्यायचं असेल, तर ते कायदेशीर द्यावं लागेल, असं गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, राजकीय पुढाऱ्यांबद्दल राज्यभरात मराठा आंदोलकांमध्ये संताप आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आमदार खासदारांनी राजीनामा द्यावा यासाठी मराठा आंदोलकांकडून दबाव आणला जात आहे. त्यात भाजपाचे गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा पत्र पाठवले आहे. त्याचसोबत शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनीही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे.
...तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल-
आज रात्री आणि उद्या रात्रीपर्यंत जाळपोळ बंद करा, अन्यथा उद्या रात्री मला नाविलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत असा अंदाज आहे. सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली. आज रात्री, उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केलेले किंवा नेत्यांच्या घरी गेल्याची बातमी आली तर मला उद्या रात्री प्रेस घेवून वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.