वडीगोद्री (जि.जालना) : मराठा आरक्षणाबाबत शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर दिवाळी साजरी झाली. त्याची अंमलबजावणी होऊन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी होईल. परंतु समाजाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
मुंबई येथून परतल्यानंतर रविवारी सकाळी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठ्यांनी आंदोलन जिंकले आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्याच्या आधारावर सग्यासोयऱ्यांना, गणगोताला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा तयार करण्यासाठी अधिसूचना जारी केली. त्याची तत्काळ अंमलबजावणी होऊन पहिले प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. शासनाने मराठवाड्यासाठी १८८४ चे गॅझेट, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट लागू करावे, अशी विनंतीही जरांगे यांनी केली.
रायगडला शिवरायांच्या दर्शनासाठी जाणार विश्वाची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. २९ जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणार असून, ३० जानेवारी रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत. ३१ जानेवारी रोजी आपण घरी जाणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.