VBA Prakash Ambedkar ( Marathi News ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या विविध मागण्या मान्य केल्याने त्यांची पदयात्रा नवी मुंबईतील वाशी येथे समाप्त करण्यात आली. मराठा आंदोलनातून यशस्वी मार्ग काढल्यामुळे एकनाथ शिंदेंचं कौतुक होत असताना सत्ताधारी महायुतीतीलच काही नेत्यांच्या विरोधाचाही त्यांना सामना करावा लागत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व घटनाक्रमाबाबत आपली वेगळी भूमिका मांडत खळबळजनक दावा केला आहे.
"मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कराराने दोन बळी घेतले आहेत असं मी मानतो. एक बळी भाजपचा गेला आहे आणि दुसरा जे सरंजामी पुढारी होते, ज्यांनी भूमिका घेतल्या नाहीत, ते आता बोल्ड आऊट झाले आहेत," असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात जो समझोता झाला. त्या समझोत्यामुळे ओबीसींचा असा समज झाला आहे की, भाजपने आम्हाला फसवलं आहे. धर्माचा प्रचार करून आमची मत त्यांनी घेतली. पण, आमचे रक्षण भाजपने केले नाही. म्हणून, ओबीसी पूर्णपणे भाजपपासून तुटलेला आहे," असं मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं आहे.
दरम्यान, "भाजपला घटना मोडीत काढायची आहे. म्हणून जे कोणी घटना मोडीत काढायला निघाले आहेत ते त्यांच्या जवळचे आहेत," असा हल्लाबोलही आंबेडकरांनी केला.