मुंबई : राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडवून हवाई मार्गांना बळ देण्यासाठी प्रयत्नशील असून, चालूवर्षात काही मार्गिका खुल्या केल्या जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमरावती विमानतळावरून उड्डाणे सुरू होतील, तर पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा १८ फेब्रुवारी आणि पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा १ मार्चपासून सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील विमानतळांचा विकास आणि नवीन सेवा सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कपूर यांची भेट घेतली. यावेळी उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र येथील शेतमालास बाजारपेठ मिळण्यासाठी जिल्हास्तरीय मालवाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली गेली.
अमरावती विमानतळासाठी अतिरिक्त निधीअमरावती विमानतळासाठी केंद्र सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील ६.५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. राज्य शासनाकडूनही या विमानतळासाठी अतिरिक्त २३ कोटी मिळणार आहेत. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या मदतीतून येत्या तीन ते चार महिन्यात ६४ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दीपक कपूर यांनी शिष्टमंडळाला दिली.
कोणते विमानतळ कधी सुरू होणार? नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येईल. पुणे-शिर्डी-नागपूर मार्गावर अलाइन्स एअर १८ फेब्रुवारीपासून सेवा सुरू करेल, तर पुणे-औरंगाबाद-नागपूर सेवा १ मार्चपासून सुरू केली जाणार असल्याची माहिती दीपक कपूर यांनी दिली.
विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरतर्फे जिल्हास्तरावर प्रशिक्षण केंद्र उभारून स्थानिक युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी गांधी यांनी दिली. चेंबरच्या नागरी विमानोड्डाण समितीचे सुनीत कोठारी यांनी, विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाच्या मूल्यवर्धित करात कपात करून तो एक टक्का करावा, असे सुचविले.