सातारा : महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. ती विचार सोडलेली आघाडी आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागलेली आघाडी आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या त्या आघाडीत लवकरच बिघाडी होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकदिवसीय सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून वाद सुरू आहेत. त्यांनी त्यापेक्षा विरोधी पक्षनेतेपदाचा उमेदवार ठरविणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात अडकणार आहेत. महायुतीत कोणतीही स्पर्धा नाही आणि मी तर स्वत:ला मुख्यमंत्री न मानता सर्वांना उपलब्ध असलेला कॉमन मॅन समजतो.
गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत रेकॉर्ड ब्रेक विकासकामे झाली आहेत. याची पोचपावती जनता मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाही. महायुती समन्वयाने लढेल. कोणाला किती जागा द्यायच्या व कुठे कोणते उमेदवार द्यायचे हे दोन दिवसांत ठरेल, असेही ते म्हणाले.
हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे परत दरे गावीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. दरम्यान, ते आपल्या हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे व प्रचंड पाऊस पडत असल्याने हेलिकॉप्टर पुन्हा दरे गावी उतरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री कारने पुण्याकडे रवाना झाले.