- रमेश कदमकळमनुरी : नोटबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी कायद्यांबाबत लोकसभा किंवा राज्यसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता आमचे माइक बंद करण्यात येतात. माध्यमांसमोर काही बोलले तरी त्याचाही उपयोग होत नाही. त्यामुळेच देशातील रस्त्याने भारत जोडो यात्रा काढण्याचा पर्याय आम्हाला सुचला. या माध्यमातून देशातील कोट्यवधी लोकांपर्यंत आम्ही आमचा आवाज थेट पोहोचवित आहोत, अशा शब्दात खा. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील सहाव्या दिवशी कळमनुरी येथील आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान मंडळ नेते बाळासाहेब थोरात, संपतकुमार, प्रणिती शिंदे, माजी मंत्री वर्षा गायकवाड, आ. प्रज्ञा सातव, माजी मंत्री रजनीताई सातव यांची उपस्थिती होती.यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी दिवंगत राजीव सातव यांची आठवण काढली. आजघडीला देशात भीती दाखवून द्वेष पसरविला जात आहे. आम्हाला भारत जोडो यात्रेची गरज काय, असा प्रश्न विचारला जात होता; परंतु, हेलिकाॅप्टर किंवा विमानाने फिरून देशातील जनतेचे प्रश्न समजत नाहीत, असेही ते म्हणाले.
आवाज दाबल्यामुळेच ‘भारत जोडो’चा पर्याय, कळमनुरीत राहुल गांधी यांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 11:00 AM