लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेली दोन-अडीच वर्षे आम्ही न्यायमंदिराची दारे ठोठावत आहोत, आता हात दुखायला लागले आहेत. न्यायालयावर विश्वास आहे; पण, न्याय मिळत नाही. म्हणून आता माता जगदंबेलाच आम्ही साकडे घालत आहोत की, तू तरी आता दार उघड. राज्यात सध्या अराजक माजले आहे. तोतयेगिरी चालली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने राज्यातील रणरागिणींच्या हातात जगदंबेची मशाल आली पाहिजे. त्यासाठी जगदंबेने तिचे तेज महिलांच्यात दिले पाहिजे, असे साकडे उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी घातले.
शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘दार उघड बये दार उघड, असुरांचा संहार कराया मशाल हाती दे’ या अराजकीय गाण्याचे लोकार्पण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. हे गाणे फक्त ऑडिओ स्वरुपात उपलब्ध असून नंदेश उमप यांनी ते गायले आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान वापरण्याची परवानगी देणारे पत्र मुंबई महापालिकेने उद्धवसेनेला दिले आहे.
‘सगळ्यांचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार’ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, सध्या आमच्या विरोधात जे कोणी बोलत आहेत त्यांना बोलू द्यात. या सगळ्यांचा फडशा मी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पाडणार आहे. उद्धवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.