मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात दररोज एकेका आमदारांची संख्या वाढत असताना शिवसेनेच्या गोटातली चिंता वाढली असून कायदेशीर लढाईसोबतच आता शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी ठिकठिकाणी त्यांनी बंडखोर आमदारांच्या संपर्क कार्यालयावर हल्ले केले. त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह आमदार तानाजी सावंत, सुहास कांदे, शंभुराज देसाई यांच्या कार्यालयावर हल्ले करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करीत शिवसैनिकांनी शनिवारी जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी नामफलकाला काळे फासले, त्यानंतर आमदार तानाजी सावंत गद्दार असल्याच्या घोषणा देत कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या आणि काचांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. माजी नगरसेवक विशाल धनावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
औकातीत राहावं, अन्यथा ‘जशास तसे’; सावंतांचा इशारातोडफोड करणाऱ्यांनी औकातीत राहावे, अन्यथा ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा इशारा सावंत यांनी सोशल मीडियावरून इशारा दिला आहे. त्यांचे बंधू, माजी जिल्हाप्रमुख शिवाजी सावंत यांनी मात्र तोडफोड करणारे जर शिवसैनिक असतील तर आमच्याच लोकांवर कारवाई कशी करणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
शहाजीबापूंच्या कार्यालयास संरक्षण- सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयाला तसेच चिकमहूद या मूळ गावातील घरासमोरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सावंतवाडीचे शिवसेना आमदार दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केसरकर यांच्या घरी निवासस्थानासमोर राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच सावंतवाडीत विशेष कृती दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, या दलाच्या जवानांनी सावंतवाडीत संचलन केले.
‘कल्याणकरांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही’ -शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले असले तरी ते युतीतून निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशा शब्दांत खासदार प्रताप चिखलीकर यांनी कल्याणकरांची पाठराखण केली. चिखलीकर म्हणाले, शिवसैनिकांसाठी अगोदर मुख्यमंत्री नॉट रिचेबल होते. आता आमदार नॉट रिचेबल झाले आहेत, एवढाच काय तो फरक आहे. नांदेडात कोणाची ताकद किती आहे हे सर्वांना माहिती आहे.
‘गद्दारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही’ -शिवसेनेशी जो नडला, त्याला शिवसैनिकांनी गाडला, गद्दारांचं करायचं काय... अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी शनिवारी परभणीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जिल्ह्यात कदापि पाऊल ठेवू देणार नाही, असा दृढ निश्चय करीत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले.
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले. यावेळी शिंदे व गुलाबराव पाटील यांचे छायाचित्र दोन गाढवांना लावून त्यांची धिंड काढण्यात आली.