नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात, मी भाजपात प्रवेश करतोय - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:31 PM2024-02-13T12:31:59+5:302024-02-13T12:32:35+5:30

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी किमान ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपप्रणीत महायुतीने समोर ठेवले आहे

The beginning of a new political journey, I am joining BJP - Ashok Chavan | नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात, मी भाजपात प्रवेश करतोय - अशोक चव्हाण

नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात, मी भाजपात प्रवेश करतोय - अशोक चव्हाण

मुंबई - Ashok Chavan Join BJP ( Marathi News ) राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज ते भाजपात प्रवेश करत आहेत. मी माझ्या नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात करतोय. मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. 

पक्षप्रवेशापूर्वी अशोक चव्हाण म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश होतोय. माझ्या नव्या राजकीय आयुष्याची ही सुरुवात आहे. मी कुणालाही निमंत्रित केले नाही. मी कुठल्याही कामासाठी घरातून निघताना पूजा करतो. हे नित्यनियम आहे. काँग्रेसचा विषय संपला आहे. आता नवीन सुरुवात होतेय असं त्यांनी म्हटलं. 

अशोक चव्हाणांची कारकिर्द 

काँग्रेसचे महाराष्ट्रातील दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा मंत्री, दोन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी धक्कादायक निर्णय घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. १९८२ मध्ये अशोक चव्हाणांनी सक्रीय राजकारणाला सुरुवात केली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ते काम करत होते. १९८७ च्या नांदेड पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. शरद पवारांच्या सरकारमध्ये ते राज्यात राज्यमंत्री म्हणून काम करत होते. २००८ आणि २००९ या काळात दोनदा अशोक चव्हाणांवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१४ मध्ये मोदी लाटेतही नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण निवडून आले होते. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी किमान ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपप्रणीत महायुतीने समोर ठेवले आहे. अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे बडे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले तर अर्थातच मोठा फायदा होईल. चव्हाण यांच्यासोबत येत्या दोन-चार दिवसांमध्ये काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जातील असे म्हटले जात आहे. त्या परिस्थितीत या आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. 

Web Title: The beginning of a new political journey, I am joining BJP - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.