यादवकुमार शिंदे -सोयगाव (छत्रपती संभाजीनगर) : प्रसिद्ध निसर्गकवी ना.धों. महानोर यांनी ज्या ठिकाणाहून लिखाणाची सुरुवात केली, त्या त्यांच्या शेतातील शांतीवन कुटी परिसरात गुरुवारी नीरव शांतता दिसून आली. यावेळी पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता.
महानोर यांचे पळसखेड गाव शिवारात शेत असून, त्यांच्या लिखाणाची सुरुवातच या शेतातील शांतीवन या कुटीतून झाली. पद्मश्री महानोर यांनी ओढ्याच्या काठावर बसूनही आपल्या लेखणीतून ग्रामीण जीवन शब्दबद्ध केले, असे त्यांचे पुतणे प्रफुल्ल महानोर यांनी सांगितले. त्यांच्या निधनाचे वृत्त पोहोचताच येथील पक्ष्यांचा किलबिलाट थांबल्याचे पाहावयास मिळाले. ज्या चिंचेच्या झाडाखाली बसून त्यांनी अनेक कवितांना शब्दबद्ध केले, ते चिंचेचे झाड गुरुवारी स्तब्ध झाले होते.
महानोर यांनी आनंदयात्रा निवासस्थानाजवळच्या शेताचे ‘सीताफळ मळा’ असे नामकरण केले होते. मळ्याजवळच त्यांनी त्यांच्या अर्धांगिनी दिवंगत सुलोचना यांच्या नावाने सुलोचनाबाग तयार केली असून, त्याठिकाणी त्यांनी, ‘या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो’, अशा काव्यपंक्ती अधोरेखित केल्या आहेत.