लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक काळ महिनाभर हे अधिवेशन चालणार आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये पूर्वसंध्येलाच जाेरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
राज्य विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंचत चालणार आहे. ८ मार्च रोजी अर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. बजेटवर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. अधिवेशनात एकूण १३ विधेयके मांडली जाणार असून विधान परिषदेत प्रलंबित असलेली तीन विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. नव्याने ७ विधेयके सादर केली जाणार आहेत. विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांचे बहुमत नाही, त्यामुळे ३ विधेयके वरच्या सभागृहात रखडली आहेत.