नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:54 AM2024-11-19T05:54:44+5:302024-11-19T05:55:32+5:30
प्रचार सोमवारी संध्याकाळी सहा वाजता संपल्यानंतर बुधवारी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. आता बुधवारी मतांची तोफ मतदारांच्या हाती येणार असून, ती कोणासाठी चालते आणि कोणाविरुद्ध चालते हे २३ तारखेला म्हणजेच शनिवारी निकालाच्या दिवशी कळणार आहे.
प्रचार सोमवारी संध्याकाळी सहा वाजता संपल्यानंतर बुधवारी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. याशिवाय नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही बुधवारी मतदान होत असून, त्यासाठी राज्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत.
मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असून संध्याकाळी ६ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन देऊन मतदान करू देण्यात येणार आहे.
राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ एकूण मतदार असून यात ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष मतदार, तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.
निवडणुकीचा प्रचार संपला असल्याने त्या मतदारसंघातील रहिवासी नसलेली व राजकीय प्रचारासाठी आलेली राजकीय व्यक्ती त्या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाने निर्देश दिले आहेत.
मतदानासाठी राज्यात १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील ९९० मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर १ लाख ६४ हजार ९९६ बॅलेट युनिट, १ लाख १९ हजार ४३० कंट्रोल युनिट आणि १ लाख २८ हजार ५३१ व्हीव्हीपॅट मशीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
सभा, रॅलींनी दणाणून गेला महाराष्ट्र
- प्रचारात भाजप आणि काँग्रेसचे देशपातळीवरील प्रमुख नेते, सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री प्रचारात उतरले होते. तर स्थानिक पातळीवरील पक्षांच्या राज्यातील नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. २० दिवसांच्या कालावधीत राज्यभर सुरू असलेल्या या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, एकमेकांची काढलेली उणीदुणी तसेच काही वादग्रस्त विधानांनी हा प्रचार गाजला.
- ‘कटेंगे तो बटेंगे’, ‘एक है ते सेफ है’ या भाजपने केलेल्या प्रचाराला मविआच्या नेत्यांनी ‘पढोगे तो बढोगे’ असे दिलेले उत्तर. प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांनी मतदारांना दिलेली भरभरून आश्वासने यामुळेही हा प्रचार गाजला. शरद पवार यांच्या समर्थकांनी दिलेली ‘जिकडे म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय’ ही घोषणाही यावेळी चांगलीच गाजली.
- भाजपकडून या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या मैदानात उतरले होते. तर त्यांच्यासोबत भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री तसेच काही केंद्रीय मंत्रीही प्रचारासाठी राज्यात आले होते.
-काँग्रेसकडून राहुल गांधी हे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते, प्रियंका गांधी यांच्याही सभा झाल्या. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्कू व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मैदानात होते. पवन खेरा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या माध्यम विभागाच्या टीमचाही राज्यात मुक्काम होता.
-प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वात जास्त उत्सुकता होती, ती बारामतीत होणाऱ्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या सभांची, बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही या दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या सभा पाहिल्या.
कोणाच्या किती सभा?
नरेंद्र मोदी १०
अमित शहा १६
नितीन गडकरी ७२
देवेंद्र फडणवीस ६४
एकनाथ शिंदे ७५
अजित पवार ५७
मल्लिकार्जुन खर्गे ९
राहुल गांधी ७
प्रियांका गांधी ३
शरद पवार ६३
उद्धव ठाकरे ६०
लढवत असलेल्या जागा
महायुती
भाजप १४९
शिंदे सेना ८१
अजित पवार गट ५९
मविआ
काँग्रेस १०१
उद्धव सेना ९५
शरद पवार गट ८६