मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात विद्वेष पसरविणारी नेत्यांची विधाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रडारवर आली आहेत. त्यात ‘बटेंगे तो कटेंगे’सह मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या भावना भडकविणाऱ्या विधानांचाही समावेश आहे. असे सगळेच नारे, विधाने याबाबत मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केंद्रीय मुख्य आयुक्तांकडे अहवाल पाठविले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हणत विविध सभांमधून भाषणे दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही हाच नारा दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादविरुद्ध धर्मयुद्ध पुकारण्याचे आवाहन केले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करताना सज्जाद नोमानी यांनी भाजपला मते देणाऱ्या मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले होते. तसेच मशिदींवर बुलडोझर चालविणाऱ्यांना मते देणार का, असा सवालही केला होता.
मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने ‘लोकमत’ला सांगितले की, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सर्वच वक्तव्यांबद्दलचे अहवाल केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आम्ही पाठविले आहेत. असे साधारणत: १५ अहवाल आहेत. काहींबाबत केंद्रीय आयोगाने आमच्याकडून अहवाल मागविले होते, काहींबाबत आम्ही स्वत:हून अहवाल पाठविले आहेत. त्यावर काय कारवाई करायची याचा अधिकार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना असतात. सर्व प्रकारच्या बाबी तपासून कारवाई केली जाते.
मतदानाच्या एकाच दिवसात दीडशे गुन्हे दाखल
३५ दिवसांच्या आचारसंहिता काळात निवडणुकीशी संबंधित ५०९ गुन्हे दाखल झाले आणि मतदानाच्या एकाच दिवसात बुधवारी १५० गुन्हे दाखल करण्यात आले.
एकूण ७०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १२३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. गेल्यावेळेपेक्षा यंदा ५८३ कोटी रुपये अधिकची मालमत्ता (पैसे, दारू आदी) जप्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांना केली होती आयोगाने मनाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी, भायखळा, चांदिवली अशा काही मतदारसंघांमध्ये मतदानाच्या दिवशी फिरले.
प्रत्यक्षात ठाण्यातील त्यांच्या मतदारसंघातून ते वर्षा बंगल्यावर मतदानाच्या काळात जाऊ शकतील का, याची विचारणा त्यांच्या कार्यालयाने आयोगाकडे केलेली होती.
आम्ही त्यांना मतदारसंघातच थांबण्यास सांगितले होते. मात्र, ते अन्य मतदारसंघांमध्ये गेले होते का याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.