ठाणे : मुख्यमंत्र्यांनी मला ९०० खोके दिले आहेत, पण ते विकासकामांसाठी दिले असल्याची कोपरखळी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोधकांना लगावली. हे ९०० कोटी माझ्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसाठी दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सर्वाधिक निधी माझ्या मतदारसंघात दिला असून विकासाची दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ओवळा-माजिवडा या आ. सरनाईक यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून १८०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाण्यासाठी ९०० तर मीरा-भाईंदरसाठी ९०० कोटी देण्यात आले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या विकासकांच्या संदर्भात आ. सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची मागणी केली. पालिका आयुक्तांनीही या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाहीखासदार संजय राऊत यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीची व्यक्त केलेली शक्यता सरनाईक यांनी खोडून काढली. सरकार चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. सरकार स्थापन होत असताना गुवाहाटीच्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्याच देवीच्या दर्शनासाठी पुन्हा जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसारईडीच्या कारवाईबाबत पूर्वेतिहास तपासून घेणे आवश्यक असून दोन फ्लॅट आणि एक भूखंड जप्तीची कारवाई नायालयाच्या निर्णयानुसार होत असून यात कोणत्याही पक्षाचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सरनाईक यांना छेडले असता यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असे सांगितले. यापूर्वी मागून मिळत नव्हते मात्र आता न मागता मिळत असल्याचेही ते म्हणाले.