राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता, "मुख्यमंत्री आज मुख्यमंत्री आहेत. पण ते २७-२८ वर्ष माझे जुने मित्र आहे. मला संशयही नव्हता, की या संपूर्ण कारस्थानात कोण असेल, काय असेल? पण तो व्हिडिओ स्पष्ट करतो ना, की या मागे कोण असून शकतं?" असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
यासंपूर्ण प्रकरणावर बोलताना आव्हाड म्हणाले, "रात्री मुंख्यमंत्री कुणाच्या तरी घरी जेवायला जातात. त्या घरात त्या बाईला बोलावलं जातं. त्या बाईबरोबर चर्चा होते आणि गुन्हा दाखल होतो? मुख्यमंत्री आज मुख्यमंत्री आहेत. पण ते २७-२८ वर्ष माझे जुने मित्र आहे. दोघांनीही एकमेकांना खूप ठिकाणी मदत केली आहे. मला संशयही नव्हता, की या संपूर्ण कारस्थानात कोण असेल, काय असेल? पण तो व्हिडिओ स्पष्ट करतो ना, की या मागे कोण असून शकतं? जोवर माणसाला दिसत नाही, तोवर तो आंधळा असतो. माझ्यासारखा माणूस तर कशावरच विश्वास ठेवत नाही. पण आज तो व्हिडिओ बाहेर आला. त्याला नाही नाकारू शकत ना तुम्ही." आव्हाड टीव्ही ९ मराठी सोबत बोलत होते.
...हे सरकार आपल्याला जेलमध्ये टाकणार -पुढची तयारी आणि अटकपूर्व जामिनासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, पुढील न्यायिक भूमिकेसंदर्भात काय करायचे, ते वकील ठरवतील. माझ्या मनाची आत तयारी झाली आहे. की हे सरकार आपल्याला जेलमध्ये टाकणार आहे. किती दिवस ते सांगता येणार नाही. मी सर्व प्रकारची मनाची तयारी केली आहे. माझ्यावर ज्या पद्धतीने दोन गुन्हे दाखल झाले. पहिल्या गुन्हात ज्या पद्धतीने कलम बदलण्यात आले आणि मुद्दाम एक नॉनबेलएबल कलम टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता, विनयभंगाचा आरोप होतो. त्याचे विटनेस तपासले जात नाही. व्हिडिओ तपासला जात नाही. त्यातील शब्द तपासले जात नाहीत आणि थेट गुन्हा दाखल करता. विनय भंगाचं लॉजिकल मिनिंग काय? हे तरी समजून घ्यायला हवे होते. आपण काहीच न करता माझ्या सारख्याला आत फेकून देता? हे सर्व अनाकलनीय आहे. हे माझ्या बुद्धीच्या पलिकडचे आहे. मी असे राजकारण बघितले नाही. मी चाळीस वर्षांपासून राजकारणात आहे. मला पवार साहेबांसोबत ३५ वर्ष झाली आहेत. एवढे घाणेरडी राजकारणाची पातळी मी आयुष्यात बघितली नाही.
आलिया भोगासी असावे सादर, लढावं तर लागेलच... -पुढच्या भूमिकेसंदर्भात बोलताना, आव्हाड म्हणाले, राजकारणाचे डायनामिक्स दर मिनिटाला बदलतात. त्यामुळे परिस्थिती नुसार निर्णय घेऊ. एवढेच नाही तर, मराठीत एक म्हण आहे, आलिया भोगासी असावे सादर, म्हणजे शेवटी आला अंगावर तर शिंगावर घ्यावाच लागेल ना. लढावं तर लागेलच. न लढता निपचित पडणं, हे आपल्या धर्मात नाही. लढून मरीन, पण कुणाच्या पायाशी शांत बसून जिवंत राहण्यापेक्षा, समोरच्याला आव्हान देत मी माझं मरण पत्करीन, असेही जितेंद्र आव्हा यांनी म्हटले आहे.