एकनाथ शिंदेंकडील अपक्ष आमदारांची ताकद आता वाढू लागली असून आणखी एका आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हातावर तुरी देऊन गुवाहाटीकडे निसटले आहेत. मुक्ताई नगरचे चंद्रकांत पाटील हे एकनाथ शिंदेंच्या गटाला जाऊन मिळाले आहेत.
काही वेळापूर्वीच पाटील यांच्या विमानाने गुवाहाटीकडे उड्डाण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाटील यांना मुंबईला येण्यास सांगितले होते. तेव्हा त्यांनी मुंबईला यायला निघतो असे सांगत विमानतळ गाठला. परंतू, ते गुवाहाटीच्या विमानातून तिकडे रवाना झाले. टीव्ही ९ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अशाप्रकारे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारा आणखी एक अपक्ष आमदार निसटला आहे. काही तासांपूर्वीच गीता जैन देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गेल्या होत्या. त्याशिवाय बच्चू कडूंसह तीन अपक्ष आमदार आधीपासूनच शिंदे यांच्यासोबत आहेत.
तर दुसरीकडे दोन आमदार शिंदे यांच्या गटातून निसटले आहेत. काल एक आमदार कैलास पाटील गाडीतून बाहेर पडत पावसाचा आणि अंधाराचा फायदा घेत निसटले होते. चार किमी पायी चालत त्यांनी अखेर मुंबई गाठली होती. आता काही वेळापूर्वीच नागपूर विमानतळावर गुवाहाटीहून नितीन देशमुख आले आहेत. त्यांनी आपल्याला इंजेक्शन टोचण्यात आल्याचा आरोप केला आहे.