मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार चालते पण सरकार मात्र बंदच आहे. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून आणलेले सरकार तरी त्यांनी नीट चालवून दाखवावे असा टोला राज्यसभेच्या निकालानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.
भाजपच्या विजयाबद्दल पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे, डॉ.भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, गिरीश महाजन, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, आ. मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
विजयी उमेदवारांचा सत्कार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. फडणवीस म्हणाले, अडीच वर्षांपासून या सरकारबद्दल जनता तर नाहीच पण सत्तापक्षातील आमदारदेखील खूश नाहीत. हे आमदार मला येऊन सांगत होते की भाऊ! तिसरी जागा तुम्ही लढवाच. त्यांच्यासोबतच्या आमदारांनी भाजपला मतदान केले. या निवडणूक निकालाने महाविकास आघाडी सरकारने अंतर्मुख होण्याची गरज आहे. राज्य थांबले आहे, विकास थांबला आहे.