सध्या शेती करणं हे फारसं फायदेशीर मानलं जात नाही. त्यामुळे शेती व्यवसाय आणि शेतकरी यांना राहिलेला मान पूर्वीसारखा राहिलेला नाही. मात्र शेतात राबून सोनं पिकवणाऱ्या आपल्या वडिलांची आठवण राहावी म्हणून मुलांनी घराजवळ वडील किसन दुधाने यांचा पुतळा उभारला. या पूर्णाकृती पुतळ्यामध्ये वडिलांसह बैलजोडीचं चित्रही साकारण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यातील खिंगर येथील शेतकरी असलेल्या किसन दुधाने यांच्या अनिल दुधाने, संजय दुधाने आणि धनंजय दुधाने या मुलांनी हा पुतळा उभा केला आहे.
याबाबत अनिल दुधाने यांनी सांगितले की, शेतीच्या माध्यमातून माझ्या वडिलांनी जगाला आपली ओळख करून दिली. त्यांनी साताऱ्यातील खिंगरसारख्या छोट्या गावात त्यांनी कठीण परिस्थितीचा सामना करत शेती फुलवली. माझे वडील किसन दुधाने यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी आम्ही हा पुतळा उभारला आहे.
शेतकरी किसन दुधाने यांनी काबाडकष्ट करून कुटुंबाचा सांभाळ केला. मुलांना मोठं केलं. समाजाला मदत केली. त्याबरोबरच सामाजिक, राजकीय आणि शेतीच्या क्षेत्रात योगदान दिलं होतं. त्यांनी शेतकऱ्यांना नवनव्या प्रयोगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल, यासाठी त्यांनी नेहमीच इतरांना मार्गदर्शन केले. तसेच किसन दुधाने यांनी स्ट्रॉबेरीवर केलेल्या संशोधनाबाबच महाराष्ट्र शासन आणि इतर काही संस्थांनी त्यांना सन्मानित केलं होतं.