मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेला मंत्रालयातील मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठीची कार्यवाही करण्यास सांगितले आहे.फडणवीस मुख्यमंत्री असताना या कक्षाच्या माध्यमातून हजारो लोकांवर महागड्या इस्पितळांमध्ये मोफत उपचार करण्यात आले होते. मंत्रालयातील सातव्या माळ्यावर असलेल्या कक्षात रोज शेकडो लोकांची गर्दी असायची.
ओमप्रकाश शेटे यांनी कक्षाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली. या कक्षाच्या माध्यमातून दिलासा मिळालेले हजारो लोक हे एकप्रकारे गावोगावी फडणवीस यांचे सदिच्छादूत बनले होते. साडेबाराशे कोटी रुपयांचे उपचार त्यावेळी मोफत झाले. शेटे हे आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे खासगी सचिव आहेत. एकनाथ शिंदे यांनी गेल्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना आरोग्यक्षेत्रात मोठी समाजसेवा केली. कोरोना काळात हजारोंना मदत पोहोचविली. खा. श्रीकांत शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. पूर्वी पत्रकार असलेले मंगेश चिवटे यांनी शिंदे यांच्या आरोग्यसेवेचा रथ सक्षमपणे सांभाळला. कक्ष पुन्हा सुरू होण्यासाठी त्यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा हा कक्ष सुरू होणार आहे.