मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पडलेला गारवा आता परतीच्या वाटेवर आहे. शक्यतो १३ फेब्रूवारीपासून राज्यातील थंडी कायमचीच कमी होईल आणि यंदाच्या हिवाळी हंगामाची सांगता होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. तर हवामानात बदल होत असतानाच पुढील ३ ते ४ दिवस विदर्भाच्या काही भागात, मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यात १२ फेब्रुवारीपर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे. रविवारी अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तुरळक ठिकाणी कदाचित किरकोळ गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यात रविवारी ढगाळ वातावरणाची व अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील जिल्ह्यात वातावरण स्वच्छ असेल.
विदर्भातील पावसाळी वातावरण मावळल्यानंतर १३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील थंडी कायमचीच गायब होवून यावर्षीच्या हिवाळी हंगामाच्या थंडीची सांगता झाली, असेच समजावे. थंडी लवकर गेल्यामुळे त्याचा शेतपिकावर परिणाम जाणवेल. सध्या हुरड्यावर आलेली धान्यपिके एकाकी ओढून येऊन परतणीच्या मार्गावर असतील. त्यामुळे अपेक्षेपेक्षा लवकरच काढणीस येतील.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
- नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.- दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जो काही सरासरी इतका पहाटेचा गारवा जाणवतो त्या ऐवजी अधिक ऊबदारपणा जाणवेल.- थंडी लवकर जाईल. त्याऐवजी अधिकची उष्णता जाणवण्यास लवकरच सुरुवात होईल.- अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारीतील पहाटेचे किमान तापमानसरासरी इतकेच जाणवेल.