सिल्लोड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडंखोरी केल्यापासून ठाकरे गटातील नेते त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. तसेच, शिंदे गटाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, गेल्या काही काळात घडलेल्या सर्व घटनांवर भाष्य केले.
सेनेत अनेकांचे खच्चीकरण झाले'शिंदे पुढे म्हणाले की, 'ही आताची लढाई सोपी नव्हती. लोकं सत्तेत येण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही सत्तेतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना पन्नास-शंभर कोटी निधी मिळायचा आणि आपल्या नेत्यांना दहा-पाच कोटी दिले जायचे. त्यांना सुरक्षा मिळायची आणि आपले खच्चीकरण व्हायचे. इथे रामदासभाई कदम आहेत, त्यांचे किती खच्चीकरण केले, हे साऱ्या जनतेने पाहिले आहे. त्यांचे मतभेद असतील, पण त्यांच्या मुलाने काय केले? आमदार योगेश कदम यांचे किती खच्चीकरण केले. त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. ज्या माणसांनी बाळासाहेबांसोबत काम केले, त्या माणसांची तुम्ही काय अवस्था केली?' असा सवालही शिंदे यांनी यावेळी केला.
'आम्ही गद्दारी केली असती तर...'ते पुढे म्हणणतात की, 'आम्ही गद्दारी केली असती, सत्तापिपासू असतो, बंडखोरी केली असती, तर इतकी लोक आमच्यासोबत आले नसते. मी जिकडे जातोय, तिकडे लाखो लोक येतायेत, ही जनता आमच्या पाठिशी आली नसती. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कधी जवळ केलं नाही, त्यांच्या शब्दाला तुम्ही तिलांजली दिली. आम्ही हिंदुत्वाचे विचार पुढे नेत आहोत. जी लोक सावरकरांवर बोलायची, त्यांच्याविरोधात एकही शब्द आम्हाला काढता यायचा नाही. ज्यांचे दाऊदसोबत कनेक्शन आहे, त्यांच्याविरोधात आम्ही बोलू शकत नव्हतो. मग बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार पुढे कसे नेणार. बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरोधात लढायला शिकवलं आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी यावेळी दिली.
'आघाडी करू नका असं आम्ही म्हणालो होतो'ते पुढे म्हणाले की, 'मी साक्षीदार आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडून आलो होतो. मी तेव्हा उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो शोधण्याची इच्छाशक्ती असावी लागते. पण, तसं झालं नाही. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा आम्ही सगळे म्हणालो होतो, ही अशी आघाडी करू नका. पण, पक्षाचा आदेश ऐकायचा असतो, बाळासाहेबांची शिकवण आहे. नंतर आघाडी सरकार स्थापन झालं,' अशी माहिती शिंदेंनी दिली.