संविधानाची मोडतोड काँग्रेस राजवटीतच, ते कुणीही बदलू शकत नाही- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:33 IST2025-03-27T13:33:03+5:302025-03-27T13:33:29+5:30
'भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या विषयावरील चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते

संविधानाची मोडतोड काँग्रेस राजवटीतच, ते कुणीही बदलू शकत नाही- देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेस राजवटीत संविधानात सर्वाधिक बदल करण्यात आले. इंदिरा गांधींच्या राजवटीत संविधानात ९९ वेळा बदल करण्यात आले. मात्र देशाचे संविधान इतके परिपक्व झाले आहे की या संविधानाची कुणी छेडछाड करू शकत नाही आणि संविधान कुणी बदलू शकत नाही. त्यामुळे संविधान बदलण्याचा आरोप करणे बंद करा, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विरोधकांना लगावला.
विधानसभेत मंगळवार आणि बुधवारी 'भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या विषयावरील चर्चा पार पडली. या चर्चेचा समारोप करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
देशाच्या सर्व संस्था कलंकित करायचे त्या संस्थांना अराजकतेकडे न्यायचे, आपल्याला सत्तेवर येता येत नाही, त्यामुळे संस्था बदनाम करायच्या, या संस्था बदनाम करतो, तेव्हा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर अविश्वास दाखवतो. पण संविधानाने या संस्था अशा बळकट केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संविधानात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची आहेत. यातील काही तत्त्वांबाबत टीका होते. पण पहिले तत्त्व आहे, समान नागरी कायदा. डॉ. आंबेडकरांनी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम ४४ मध्ये प्रत्येक राज्यावर ही जबाबदारी टाकली आहे की, त्या राज्याने समान नागरी कायदा आणला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.