मुंबई: संपूर्ण भारतात लोकसंख्यावाढीला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने हम दो हमारे दो असे घोषवाक्य तयार केले होते. मात्र गेल्या काही वर्षात नवरा- बायको दोघेही नोकरी करत असल्यामुळे एक मूल झाल्यावर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेत आहेत. स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याला ठेवायचे असेल तर त्याला खासगी इंग्रजी शाळेत घालावे लागते, विशेष म्हणजे महागाई खूप झाली असून शिक्षणाचा खर्च वाढला आहे. अनेक वेळा जोडप्यांना त्या खर्चाची चिंता असते. त्यातून नोकरीमुळे मुलांना वेळ देणे अनेक वेळा शक्य होत नाही. त्यामुळे एक मुलावर थांबण्यासाठी काही जोडपी पसंती देत आहेत.
चांगला न्याय देता आला पाहिजे मला एक मुलगी आहे. आम्ही दोघेही कामावर जातो. या प्रक्रियेत आपण आपल्या मुलीला किती गुणवत्तापूर्वक वेळ देतो, हा प्रश्न मी माझ्या मनाला विचार असतो. कारण आता एका मुलगी आहे तर आमच्या दोघांची तारांबळ उडते. आम्ही दोघे कामावर असल्यावर माझ्या कुटुंबातील काही सदस्य आहेत ते तिची काळजी घेत असतात. आपल्या कामाच्या वेळा निश्चित नाही. या सगळ्या गोष्टीमुळे दुसऱ्या मुलाचा विचार करवत नाही. सध्या मला माझ्या एकाच मुलीला योग्य न्याय द्यायचाय. - सागर सानप, मुंबई सेंट्रल
प्रचंड स्पर्धा आहे सध्याच्या युगात शिक्षण घेण्यापासून ते स्वतःच व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी बाजारात मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत तुम्हाला टिकायचे असेल तर मुलांवर शैक्षणिक गुंतवणूक करणे. सध्याच्या घडीला हे क्षेत्र खूप महाग झाले आहे. परदेशी शिक्षणाच्या संधी सध्या उपलब्ध झाल्या आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज लागतेच. त्यामुळे एका मुलीला हवे तसे शिक्षण द्यायचे आहे. कारण आम्ही दोघे कामावर असतो. त्यामुळे एकाच मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. - मिलिंद जाधव, वरळी
'दुसऱ्याचा' विचार मनात येत नाही आम्ही दोघेही नोकरीला आहोत. आम्हाला एक मुलगी आहे ती आता आठ वर्षांची झाली आहे. मला माझ्या नोकरीच्या व्यस्त वेळेमुळे फार तिच्याशी गप्पा मारता येत नाही. तिचा अभ्यास घेता येत नाही. या सगळ्या गोष्टी मनात आल्या की दुसरे मूल हवे हा विचार मनात येत नाही. माझ्या अनेक नातेवाइकांमध्ये आणि बहुतांश मित्रांमध्ये एका मुलावर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाला मुलगी किंवा मुलगा असो, एका मुलावर ते थांबले आहेत. रोहन भोगटे, अंधेरी