Balasaheb Thackeray ( Marathi News ) : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राजकीय प्रतिस्पर्धी राहिले असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक आयुष्यात मात्र कमालीचे मैत्र होते. २००६ साली शरद पवार हे आजारी असताना बाळासाहेबांनी आस्थेवाईकपणे चौकशी करणारं आणि प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन करणारं एक पत्र पवारांना लिहिलं होतं. "फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे," असं बाळासाहेबांनी पवार यांना उद्देशून म्हटलं होतं. हेच पत्र शेअर करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "शिवसेनाप्रमुखांचे पत्र... शरदबाबूंना त्यांनी थोरला म्हणून आदेश दिला होता. प्रत्येक शब्दात आपलेपणा होता. नाहीतर द्वेष आणि सुडाने भरलेलं आजचे राजकारण... कोण कधी मरतो याची वाट पाहणारे...नवीन पिढी हे वाचेल तर म्हणेल की, राजकरणात एवढी प्रेम आपुलकी एकमेकांबद्दल होती," अशा शब्दांत आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त करत बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलेलं तेव्हाचं पत्र शेअर केलं आहे.
बाळासाहेबांनी शरद पवारांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं...
"प्रिय शरदबाबू यांसीजय महाराष्ट्र!आपण केंद्र शासनात कृषिमंत्री या पदावर विराजमान आहात. तरीपण हे पद बाजूला सारून आपल्याला मी माझे जुने मित्र शरदबाबू या नावानेच विचारणार आणि बोलणार. आपण बरे झालात हे ऐकून बरे वाटलेः परंतु वडीलधाऱ्या अधिकाराने आम्ही आपल्याला आदेश देत आहोत की, यापुढे जरा वणवण कमी करा. झेपेल तेवढे जरूर करा! पण अलीकडे आपला दौऱ्यावर जाण्याचा सुकाळ झाला होता. वाकड्यातिकड्या मार्गाने आपण दौरे करीत होता, परदेश दौऱ्यांतही कोठे कमतरता नव्हती, आपल्या पक्षाची निशाणी जरी घड्याळ असली तरी आणि त्या घड्याळाचे काटे जरी स्थिरावले असले तरी आपल्या आयुष्याचे घड्याळ टिक टिक करीत त्याचे काटे पुढे सरकतच असतात हे विसरू नये.
सोनियाच्या 'कथली' राजवटीत आपण अन्न व शेती मंत्री आहात. सध्याच्या परिस्थितीत हे महत्त्वाचे खाते आपण सांभाळीत आहात. त्यामुळे फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे. त्यामुळे स्वतःसाठी नसले तरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तुम्हाला जगावेच लागेल. त्याप्रमाणे वागणूक ठेवावी व प्रकृतीची काळजी घ्यावी."