निपाणी - देशातील सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण देशातील लोकांची भूक मिटवणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणं घेणाऱ्या लोकांना बाजूला केलं पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
निपाणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा तसेच नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले की, मी कृषीमंत्री झालो तेव्हा लातूरमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समजली. मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंहांना भेटलो. त्यांना म्हंटले आपण या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी दिल्लीवरुन नागपूरला आलो, तिथून त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचलो. त्यांच्याशी संवाद साधला. आम्ही तेथे विचारलं तर कळालं की, आधीच डोक्यावर कर्ज, त्यात दुष्काळी परिस्थिती आली. अशातच शेतकऱ्यांवर सावकाराने कारवाई करत त्याच्या घराचा लिलाव काढला. या चहुबाजुने आलेल्या संकटामुळे त्या शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. शेतकऱ्यांचा सन्मान राहला नाही की ते जीव देतात, तीच परिस्थिती आजसुद्धा आली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच त्या शेतकरी आत्महत्येनंतर रिझर्व्ह बॅंकेकडून माहिती घेतली की, देशातील किती शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. तर माहिती आली की, ७२ कोटी. यावेळी एका क्षणाचाही विचार न करता ७२ कोटींचं कर्ज माफ करून टाकलं. परंतु आज त्या शेतकऱ्याकडे कुणी ढुंकून पाहत नाही. कंदा उत्पादक, हरभरा उत्पादक शेतकरी संकटात असतानाही त्यांच्याकडे कुणी बघत नाही. मी कृषीमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अमेरिकेतून धान्य मागविण्यासाठीच्या परवानगीची पहिली फाईल आली. मला ही गोष्ट खटकली. तिथून तीन वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली. मागेल तेवढे धान्य शेतकऱ्यांना मिळू लागले. जगातील १८ देशांना भारत धान्य निर्यात करु लागला. पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही असं शरद पवारांनी म्हटलं.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचा शिलान्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात झाला. मग काही लोक कोर्टात गेले. आता निर्णय आला. मंदिर निर्माण होत आहे. पण रामाच्या नावाचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राजकारणासाठी होत आहे. धार्मिकतेच्या राजकारणाचा वापर आज अधिक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० दिवस उपवास करणार आहेत. त्यांच्या भावनेचा मी आदर करतो. पण गरिबी हटवण्यासाठी त्यांनी काही केले असते तर बरं झालं असतं असा टोला शरद पवारांनी लगावला.