मुंबई - विधान परिषदेचे सभापतीपद आपल्याकडे कसे घेता येईल, यासाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे. सध्या रिक्त असलेल्या या पदावर भाजपच्या सदस्याची निवड करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधान परिषदेच्या ७८ पैकी २१ जागा रिक्त आहेत. सभागृहाचे संख्याबळ ५७ इतके आहे. भाजपकडे २२ सदस्य आहेत. निवडणूक झाली तर ती जिंकण्यासाठी भाजपला २९ मते लागतील, म्हणजे आणखी सात मतांची गरज लागणार आहे. रासपचे महादेव जानकर हे नाराज असले तरी ते भाजपसोबत असतील, असे मानले जाते. अपक्ष व लहान पक्षांच्या मदतीने हे संख्याबळ गाठता येईल का, याची चाचपणी केली जात असल्याचे समजते.
भाजपकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर चर्चेतमाजी मंत्री राम शिंदे यांचे नाव भाजपकडून सभापती पदासाठी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. याशिवाय प्रवीण दरेकर यांचेही नाव आहे. पण दरेकर यांना विस्तारात मंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते. शिंदे यांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावेळी प्रदेशाध्यक्ष पदासाठीही आले होते.
सभापतीपद भाजपकडे यावे यासाठी प्रयत्न विधान परिषदेचे उपसभापतीपद हे उद्धव ठाकरे गटाच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. त्यामुळे सभापतीपद आपल्याकडे घेण्यात भाजपला विशेष स्वारस्य आहे. नागपूर अधिवेशनात पहिल्या एक-दोन दिवसातच सभापतीपदाची निवड करावी, असे भाजपचे प्रयत्न आहेत. विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्याकडे कायम ठेवून विधान परिषद सभापती पदासाठी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्नही केले जाऊ शकतात. राज्यपाल नियुक्त १२, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या ९ अशा एकूण २१ जागा सध्या रिक्त आहेत.
असे आहे संख्याबळ
भाजप - २२
शिवसेना (उबाठा) - ११
राष्ट्रवादी - ९
काँग्रेस - ८
जदयू, शेकाप, रासप प्रत्येकी - १
अपक्ष - ४