लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज रद्द करण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल केला. न्यायालयाने विशेष न्यायालयाने पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.
विशेष न्यायालयाचा आदेश संदिग्ध असून आरोपीने सादर केलेल्या पुराव्यांचे विश्लेषण केलेले नाही, असे न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने म्हटले. जामीन नाकारताना यूएपीए कायद्याच्या कलम ४५डी (५) अंतर्गत आवश्यक असलेली कारणमीमांसा न्यायालयाने केली नाही. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात दिलेल्या निकालाचा विचार विशेष न्यायालयाने केला नाही. त्यामुळे न्यायालयाने नव्याने जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी, असे म्हणत उच्च न्यायालयाने पुन्हा हे प्रकरण विशेष न्यायालयाकडे पाठविले.
५ सप्टेंबर २०२२ रोजी विशेष एनआयए न्यायालयाने नवलखा यांचा जामीन फेटाळला. त्या आदेशाला नवलखा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. गुरुवारच्या सुनावणीत अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी विशेष न्यायालयाचा ५ सप्टेंबर २०२२ रोजीचा आदेश रद्द करण्यास सहमती दर्शवित असल्याचे न्यायालयाला सांगितले.
तर नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी विशेष न्यायालयाला जामीन अर्जावर जलदगतीने सुनावणी घेण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयाने विशेष न्यायालयाला चार आठवड्यांत जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.