मुंबई : शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन सोहळा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त भाजप आमदार अमित साटम यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात मराठी भाषेला उतरती कळा लागल्याचे सांगत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सर्वप्रथम आपणास हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. पण बाळासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्राची मायबोली असलेल्या 'मराठी' भाषेला आज उतरती कळा लागली आहे. खासकरून स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळे ठोकण्यात येत आहे. 'रोज मरे त्याला कोण रडे?' हाच दृष्टीकोनातून सत्ताधारी सेनेचा मराठी शाळांबाबत आहे का? असा सवाल अमित साटम यांनी केला आहे.
गेल्या वर्षी मी पत्र व्यवहार करुन आपले लक्ष या विषयाकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर न प्रतिक्रिया आली न कारवाई झाली. २०१२ - १३ मध्ये ३८५ मराठी शाळा होत्या. ८१ हजार १२६ विद्यार्थी होते. २०२१-२२ मध्ये शाळा फक्त २७२ उरल्यात आणि ३४,०१४ विद्यार्थ्यी तिथं शिक्षण घेत आहेत.म्हणजेच गेल्या १० वर्षात ११० मराठी शाळांना टाळे लागले आहे. ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आल्याची माहिती समोर येत आहे, असे अमित साटम म्हणाले.
एकीकडे सत्ताधारी सेना मराठी अस्मितेच्या बाता करून सत्तेचा मेवा उपभोगत आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांनी घसरत आहे, असे म्हणत अमीत साटम यांनी पत्राद्वारे शिवसेनेवर हल्लाबोल केला. याचबरोबर, "मी आशा करतो की तुम्ही मराठी शाळांच्या परिस्थितीची गंभीर दखल घ्याल जेणेकरून भविष्यात आपल्याला वर्धापन दिन हा 'foundation day' म्हणून साजरा करण्याची वेळ येणार नाही. जय महाराष्ट्र !", असेही अमित साटम यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणारगेले दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे शिवसेनेचा वर्धापन सालाबादप्रमाणे जल्लोषात साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन शिवसेनेकडून करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा कोरोना संसर्गबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे याही वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन मर्यादित स्वरुपातच साजरा करण्यात येत आहे. येत्या २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने आपले सर्व आमदार पवई येथील वेस्टिन हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. याच हॉटेलमधील सभागृहात आज शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.