सांगली: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले, ठाकरे गट आणि शिंदे. या दोन्ही गटातील नेते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. आता शिवसेना नेते दिवाकर रावते (Divakar Rawate) यांनीही शिंगे गटावर जहरी टीका केली आहे.
'...त्यांना श्रद्धांजली वाहा'सांगलीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिवाकर रावते म्हणाले की, 'गेलेली माणसे परत येत नाहीत, त्यामुळे त्यांचा शोक व्यक्त करत बसण्यापेक्षा किंवा ते परत येतील म्हणत बसण्यापेक्षा त्यांना श्रद्धांजली वाहून आपली कामे करा. जे गेले ते शिवसेनेचे कधीच नव्हते. भाजप बंडखोरांना जवळ करुन शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, कधीही संपणार नाही. जे गेलेत त्यांना आगामी निवडणुकीत संपवायचं आहे', असं आवाहन रावतेंनी केलं.
'पक्ष बळकट करा'रावते पुढे म्हणाले की, 'आता पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने पक्ष उभा राहील. ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आतापासून कामाला लागा. शिवसेनेकडूनच शिवसेना पाडायची हा डाव आहे. आता जास्तीत जास्त सभासद करा, या लढाईत आपल्याला शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे. एकत्र या आणि पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करा', असं आवाहनही रावतेंनी यावेळी केलं.