मुंबई - शरद पवारांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आदर आहे. परंतु त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. शरद पवारांनी काँग्रेसमधून फुटून वेगळा पक्ष काढला. आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही तर आमचा मूळ पक्ष शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना हीच आमची आहे. पक्षांतर्गंत काही मतभेद होते. आम्ही पक्ष सोडला नाही असं प्रत्युत्तर मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहे.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, पवारांनी काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी पक्ष काढला. परंतु आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही तर आम्हीच मूळ शिवसेना आहोत. बहुमतात आहोत. आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच यांच्यातही बहुमत आहे. आम्ही मूळ शिवसेना असल्याने जी चिन्हाबाबत निर्णय घेणारी संस्था निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे आम्ही आमचं म्हणणं मांडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पडताळणी करून निर्णय घेतील. आम्ही मूळ शिवसेना आहोत हे आमचं म्हणणं कालही, आजही तेच आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेनेने भाजपासोबत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी नैसर्गिक युती करून लढवली होती. आमच्या सभेत एकाबाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचे फोटो होते. युतीला राज्यातील जनतेने बहुमत देणे. नैसर्गिक युतीला लोकांनी साथ दिली. त्यानंतर मतदारांची प्रतारणा करत अनैसर्गिक आघाडी जन्माला आली. तेव्हाही आमचा विरोध होता. परंतु पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यानंतर तो पाळावा लागला. आम्ही शिवसैनिकच आहोतच. आम्ही शिवसेनेपासून बाजूला गेलो नाही. नेतृत्वाच्या कामकाज, भूमिकेबाबत आमची वेगळी भूमिका होती. त्यामुळे आम्ही शिवसेनेतच राहूनच वेगळी भूमिका घेतली आहे असं सांगत शंभुराज देसाई यांनी भाजपा नेते सुशील मोदी यांच्या टीकेवर भाष्य केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्यावर बोलणे योग्य नाही. आमच्याकडे बोट दाखवतायेत तसं विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर २४ तासांत मविआत वाद सुरू झाला आहे. तिन्ही पक्षात कुठेही आलबेल नाही. शिवसेनेत त्याबाजूला असणारी मंडळीही नाराज आहेत. आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राज्याचा विकास घेऊन पुढे चाललो आहोत. राज्यातील ज्वलंत प्रश्नावर चर्चेतून विकास गतीने पुढे घेऊन जाणे यावर सरकारचा फोकस आहे असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.