जागावाटपाची चर्चा लटकली; अजित पवार गटात अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 05:14 AM2024-08-18T05:14:17+5:302024-08-18T06:08:24+5:30
लोकसभेला त्याग केला; विधानसभेला ते नकोच : नेत्यांचा अजित पवारांवर दबाव
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा महायुतीमध्ये सुरू होत नसल्याने अजित पवार गटात कमालीची अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या जागावाटपाचा घोळ घातला गेला तर त्याचा फटका महायुतीला बसेल असे या गटाला वाटते. जागावाटप लगेच ठरले नाही तर आपले काही आमदार हे शरद पवार यांच्यासोबत जातील, असे शंकेचे वातावरणही या गटात आहे.
जागावाटप चर्चा लगेच सुरू करणार असे भाजप नेते सांगतात. भाजपच्या कोअर कमिटीची गेल्या आठवड्यात बैठक झाल्यानंतर तेच सांगण्यात आले. मात्र, अद्याप भाजपकडून शिंदेसेना वा अजित पवार गटाला कल्पना देण्यात आलेली नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘ट्युनिंग’ चांगले...
अजित पवार गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, जागावाटपाच्या दृष्टीने जो समन्वय सुरू व्हायला हवा होता तो अजूनही दिसत नाही. नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असे गृहित धरले तरी निदान जागावाटपाची चर्चा तरी लगेच सुरू व्हायला हवी.
या नेत्याने अशीही भावना बोलून दाखविली, की ही चर्चा सुरू करण्याची आमची अपेक्षा ही भाजप आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच आहे. आमचे त्यांच्याशी ‘ट्युनिंग’ चांगले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा पक्ष आमच्याप्रमाणेच भाजपचा मित्र आहे, त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी आमची अपेक्षा नाही.
कोणत्या जागा मिळणार याची खात्री द्यायला हवी...
आमच्याकडे जे आमदार आहेत त्यांचे मतदारसंघ आमच्याकडेच राहतील असे गृहित धरून आम्ही काम सुरू केले आहे पण जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून त्याबाबतची खात्री आम्हाला द्यायला हवी. तसेच, आमदार नसलेले कोणते मतदारसंघ आपल्याला मिळणार हे लगेच स्पष्ट झाले तर त्या मतदारसंघांवर फोकस करणे सोपे जाईल, अशी भावनाही या ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखविली.
दरवेळी आपणच त्याग का करायचा?
आपल्या गटाचे आणि अपक्ष मिळून अजित पवार यांच्याकडे ४५ हून अधिक आमदार आहेत.
शिंदेंसेनेच्या तुलनेत आमच्याकडे आमदार फार कमी नाहीत, त्यामुळे जागावाटपात शिंदेंइतक्याच जागा मिळाव्यात यासाठी अजित पवार यांच्यावर त्यांच्याच गटातील नेत्यांनी दबाव आणला असल्याची माहिती मिळाली आहे.
लोकसभेला महायुतीच्या हिताचा विचार करून आपण नमते घेतले आणि चार जागांवर समाधान मानले.
दरवेळी आपणच त्याग का करायचा, अशी भावना आमच्या गटात असल्याचे संबंधित नेते म्हणाले.