कसारा : मुंबई महापालिकेच्या मध्य वैतरणा धरणाच्या पाण्याची पातळी २७७.५३ मीटर आहे. धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता लवकरच मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. मध्य वैतरणा धरण ओसंडून वाहण्याची पातळी २८५ मीटर इतकी आहे. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून २८३.५० मीटर इतक्या पातळीला धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या उर्ध्व वैतरणा धरणातून सोडलेले अतिरिक्त पाणीही मध्य वैतरणा धरणात येते. मध्य वैतरणा धरणातून सोडलेले पाणी वैतरणा नदीमार्गे मुंबई महापालिकेच्या मोडक सागर धरणात जाते. या सोडलेल्या पाण्यामुळे वैतरणा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
- मध्य वैतरणा धरणाजवळील व नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा संबंधित प्रशासनाने दिला आहे.
- शहापूर तालुक्यातील पाच गावे व मोखाडा तालुक्यातील ८ गावपाड्यांचा समावेश या धरणालगत असून, सर्व नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. धरणालगत असलेल्या सावरकूट, सावर्डे, विहीगाव या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे समजते.